मा राजसाहेब ठाकरे यांनी व्हिजन वरळी च्या माध्यमातून मांडली थेट पक्षाची रोखठोक भूमिका
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वरळी मध्ये आयोजित केलंय व्हिजन वरळी

दि. २२. मुंबई.मा राजसाहेबांनी आज व्हिजन वरळी च्या प्रसंगी पक्षाची रोखठोक भूमिका मांडली आणि खालीलप्रमाणे ठळक मुद्दे आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शेअर केले.
माझ्या पक्षाचे नेते श्री. संदीप देशपांडे यांनी व्हिजन वरळी नावाचं एक वरळी विधानसभेच्या विकासाबद्दलच्या कल्पनांचं प्रदर्शन भरवलं आहे. त्याच्या उदघाट्न सोहळ्यात मी उपस्थितांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे…
१) वरळीतील बीडीडी चाळीत मी लहानपणासून कधी वडिलांबरोबर तर कधी बाळासाहेबांसोबत यायचो. आमचे एक डॉक्टर इथेच बीडीडी चाळीत रहायचे. त्यामुळे माझ्या या भागाबद्दलच्या आठवणी खूप जुन्या आहेत.
२) गेली अनेक वर्ष इथल्या बीडीडी चाळीचा प्रश्न प्रलंबित आहे, पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रलंबित आहे, कोळीवाड्यातील समस्या जैसे थे आहेत. हे सगळं बघून त्रास होतो.
तुम्ही महाराष्ट्राचे मालक ना ? तरीही तुम्हाला त्रास कसा दिला जाऊ शकतो? बाहेरच्या राज्यातील लोंकाना इथे घर मिळतात, ते इथे येऊन झोपड्या वसवून फुकटात घरं घेऊन जातात… याचं कारण तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही… आणि समोरच्यांना माहीत आहे की हे जाऊन जाऊन जाणार कुठे ? मुळात तुम्हाला या व्यवस्थेच्या लेखी किंमत नाही.
३) एखादा प्रकल्प येताना तुम्हाला का विचारलं जात नाही? आणि हे फक्त वरळीत नाही तर महाराष्ट्रभर घडतंय… आणि जिथे जिथे हे घडतंय तिथे बघा जास्त टक्का मराठी आहे. असुनी मालक घरचा चोर म्हणती त्याला अशी परिस्थिती झाली आहे आपली… आणि हे का होतं?
कारण तुम्ही त्याच त्याच लोकांना मतदान करून आमदार, खासदार निवडून देताय, मग काय तुम्हाला ते गृहीतच धरणार… तुम्हाला स्वाभिमानाने उभं रहायचं असेल, तो स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या..
४) आपल्याकडे कुठलंही शहर असू दे मग ते मुंबई का पुणे शहरं असू देत ती वेडीवाकडी पसरली आहेत, या शहरांमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन असतो पण टाऊन प्लॅनिंग नसतं. मग कुठल्याही पायाभूत सुविधांचा विचार न करता फक्त आणि फक्त बांधकामं सुरु राहतात. आणि तुम्ही सगळे स्क्वेअर फुटांच्या खेळात अडकून पडता. तुमची जागा घेणाऱ्या बिल्डरांना तुम्ही प्रश्नच विचारत नाहीत, मुळात बिल्डरांना तुमच्याशी घेणंदेणं नाही आणि त्यात तुम्ही ज्या राजकारण्यांना निवडून देता, त्यांना पण तुमच्याबद्दल काही वाटत नाही.
५) मला अनेकदा वृत्तवाहिन्या पुढच्या १० वर्षात महाराष्ट्र कसा दिसतो, व्हिजन महाराष्ट्र अशा प्रकारच्या कार्यक्रमात बोलवतात… राज्याची व्हिजन १० वर्षांची नाही तर राज्य, देश कसा घडवणार याचं १०० ते २०० वर्षांचं नियोजन पाहिजे, तसा विचार पाहिजे. १० वर्षात काही होत नसतं…
१० वर्षात अधिक वाट लागते. ३०,४० वर्षांपूर्वीची मुंबई ज्यांनी पाहिली असेल, तर त्यांना आठवत असेल या शहराला एक कॅरेक्टर होतं. आपली बेस्टची लाल रंगाची बस होती, काळीपिवळी टॅक्सी होती. ती बघितली की हे शहर म्हणजे ‘मुंबई’ हे कळायचं. आज देशात कुठल्याच शहराला ओळख राहिली नाहीये. सध्या शहरांची ओळख ही फक्त फ्लायओव्हर्स झाली आहे. आणि हे फ्लायओव्हर्स होत आहेत ते बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठी. आणि सगळ्या लोंढयांना सुविधा देण्यात इतके पैसे खर्च होतात की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांसाठी काही करायचं तर पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे…
६) इथल्या मूळच्या माणसांना सगळ्या आवश्यक त्या गोष्टी मिळाल्या, तो सुखी झाला आणि मग बाहेरचा कोणी आला तर आम्ही समजून घेऊ. पण आहे त्यांनाच काही मिळत नाहीये, आणि बाहेरच्यांना देण्यासाठी या राज्याचा सगळा पैसा खर्च होणार असेल तर हे कसं चालणार? निवडणुका, राजकारण यांत सगळे मूळ विषय बाजूला पडतात. सत्ताधारी असोत की विरोधी पक्ष असू देत, सगळे एकसारखेच वागतात.
७)अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय काँग्रेसच्या सरकारपासून सुरु होता. तेंव्हापासून मी सांगत होतो की समुद्रात पुतळे उभारण्यापेक्षा, महाराजांचे गडकिल्ले हे त्यांचे खरं स्मारक आहे, त्याची नीट देखभाल करा, पण नाही. आत्ता मध्ये महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत एक दुःखद घटना घडली. अहो तो पुतळा जमिनीवर होता, जो सुद्धा आपल्याला नीट उभारता नाही आला, इथे तर समुद्रात उभारायचा म्हणत आहेत.
८) आपल्याकडे कोणाच्या डोक्यात काय कल्पना येतात ते सांगता येत नाहीत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्यापेक्षा २ इंच मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारणार अशी घोषणा केली गेली. मुळात ज्यांनी कोणी घोषणा केली त्यांनी तरी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा पाहिला आहे का? त्यांना शिल्पकला कळते का ? महाराजांचा असा अश्वारूढ पुतळा उभारायचा ठरवला तर तो अश्व किती मोठा असावा लागेल? कोण शिल्पकार तो उभारणार आहे? आणि समुद्रात जर असा पुतळा उभा करायचा असेल तर किमान २० ते २५ हजार कोटी रुपये लागतील. मला सांगा या २० ते २५ हजार कोटींत आपले गडकिल्ले किती छान होतील. आपल्याला येणाऱ्या पिढ्याना महाराजांनी उभारलेले गडकिल्ले दाखवायचेत का महाराजांचा पुतळा ?
९)संदीप देशपांडे हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा आहे. जे घडू शकतं त्याला हो म्हणणारा आहे आणि जे घडू शकत नाही त्याला नाही म्हणणारा आहे. तो आमचा हिरा आहे. त्याने जे व्हिजन वरळी प्रदर्शन सुरु केलं आहे, ते नीट शांतपणे बघा. बाहेरचे येऊन इथे पुन्हा सगळी वाट लावली आहेत आणि लावतील हे विसरू नका. संदीपसारखे जे चांगलं काम करणारे आहेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप बसणार आहे का नाही? की ज्यांनी राजकीय आणि सामाजिक गोंधळ घातला आहे त्यांना परत संधी देणार का? वरळी खूप सुंदर भाग आहे… या वरळीसाठी जे जे माझ्याकडून होणं शक्य आहे ते होईल, ते ते मी करेन आणि या बाबतीत मला बिनदिक्त गृहीत धरा.
खालील व्हिडिओमध्ये केलेले अभ्यासपूर्ण भाषण म्हणजे मनसेचेच व्हिजन महाराष्ट्राबद्दल काय आहे हे स्पष्ट होते.